Header Ads

Kusumagraj Poems In Marathi | कुसुमाग्रज कविता संग्रह

 

नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे !!!!!!!!!! आज या पोस्ट मध्ये तुम्हाला Kusumagraj Poems In Marathi वाचायला मिळतील . त्याआधी आपण बघूया कुसुमाग्रज कोण होते ??? कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते . पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले त्यामुळे त्यांचे नाव विनायक दामोदर शिरवाडकर असे झाले . त्यांना सहा भाऊ आणि एक लाडकी बहीण कुसुम होती तिच्या नावावरून च त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव ठेवले . 
चला बघुया कुसुमाग्रजांच्या कविता -

    Kusumagraj Poems In Marathi
    Kusumagraj Poems In Marathi


    कुसुमाग्रजांनी विविध विषयांवर अनेक कविता , कथा संग्रह , नाटक लिहिले . तसेच स्वतंत्रलढ्यामध्ये सुद्धा त्यांच्या कवितांनी स्फूर्ती आणण्यास मदद केली . चला तर मग लगेच वळूया कवितांकडे -

     मौन

    शिणलेल्या झाडापाशी
    कोकिळा आली ,
    म्हणाली गाणं गाऊ का ?

    झाड बोललं नाही
    कोकिळा उडून गेली
    शिणलेल्या झाडापाशी
    सुगरण आली
    झाड बोललं नाही
    सुगरण निघून गेली

    शिणलेल्या झाडापाशी
    चंद्रकोर आली
    म्हणाली जाळीत लापु का ?
    झाड काही बोललं नाही
    चंद्रकोर मार्गस्थ झाली

    शिणलेल्या झाडापाशी
    बिजली आली
    म्हणाली मिठीत येऊ का ?
    झाडाचं मौन सुटलं
    अंगाअंगातुन
    होकारच तुफान उठलं   
                                         
          - कुसुमाग्रज

    * * * *

    दूर मनोर्‍यात

    वादळला हा जीवनसागर – अवसेची रात
    पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात

    भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
    सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

    पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
    प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

    प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
    वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

    परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
    स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

    किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
    काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

    उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात
    अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात
                                                                        
     - कुसुमाग्रज

    * * * *

    kusumagraj kavita in marathi

    अनंत

    एकदा ऐकले काहींसें असें
    असीम अनंत विश्वाचे रण
    त्यात हा पृथ्वीचा इवला कण

    त्यांतला आशिया भारत त्यांत
    छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

    घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
    क्षुद्रता अहो ही अफाट असें!
    भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
    बांधून राहती कीटक कोळी

    तैशीच सारी ही संसाररीती
    आणिक तरीही अहंता किती?
    परंतु वाटलें खरें का सारें?
    क्षुद्र या देहांत जाणीव आहे
    जिच्यात जगाची राणीव राहे!

    कांचेच्या गोलांत बारीक तात
    ओतीत रात्रीत प्रकाशधारा
    तशीच माझ्या या दिव्याची वात
    पाहते दूरच्या अपारतेंत!

    अथवा नुरलें वेगळेंपण
    अनंत काही जेंत्याचाच कण!
    डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
    आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

    वसंतवैभव उदार वर्षा
    लतांचा फुलोरा
    केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
    जीवन तेज जें अंतरी झरे

    त्यानेच माझिया करी हो दान
    गणावे कसे हें क्षुद्र वा सान?
                                                                  
           - कुसुमाग्रज

    * * * *

    kusumagraj kavita in marathi

    स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या


    स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
    अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

    सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
    वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती

    मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
    रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला

    जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
    हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा
                                                                        
     - कुसुमाग्रज

    * * * *
    kusumagraj kavita in marathi

    स्वार


    घनदाट अरण्यांमधुनी
    बेफाम दौडतो स्वार

    अवसेच्या राक्षस रात्र
    साचला नाभी अंधार

    स्तब्धात नाडिती टापा
    खणखणत खडकावरती

    निद्राला तरूंच्या रांगा
    भयचकित होऊनि बघती

    गतिधुंद धावतो स्वार
    जखमांची नव्हती जण

    दुरांतील दीपांसाठी
    नजरेत साठले प्राण

    मंझिल अखेरी आले
    तो स्फटिकचिरांचा वाडा

    पाठीवर नव्हता स्वार
    थांबला अकेला घोडा
                                                                  
           - कुसुमाग्रज

    * * * *
    Kusumagraj Poems

    सागर


    आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
    निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

    फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
    हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

    मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
    दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

    संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
    देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

    तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
    त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

    खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
    ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

    प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
    नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

    दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
    कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

    दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
    सांगतात ते मजला आता घरी जायला हवे
                                                                                             
                                                 - कुसुमाग्रज


    kusumagraj kavita in marathi

    कोलंबसचे गर्वगीत 


    हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
    समुद्रा, डळमळू दे तारे !
    विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे
    ढळुदे दिशाकोन सारे !

    ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
    दडुद्या पाताळी सविता
    आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
    करायला पाजुळुदे पलीता !

    की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
    मिळाया प्रमत्त सैतान
    जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
    करी हे तांडव थैमान

    पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे
    फुटू दे नभ माथ्यावरती
    आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी
    नाविका ना कुठली भिती

    सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा
    झूंजण्या अखंड संग्राम
    नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
    दिशांचे आम्हांला धाम

    काय सागरी तारू लोटले परताया मागे
    असे का हा आपुला बाणा
    त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी
    जपावे पराभुत प्राणा ?

    कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
    जशी ती गवताची पाती
    नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
    निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

    मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा
    घराची वा वितभर कारा
    मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
    जिंकुनी खंड खंड सारा !

    चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
    कथा या खुळ्या सागराला
    "अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
    किनारा तुला पामराला” 
                                                                                 
      - कुसुमाग्रज

    * * * *
    Kusumagraj Poems

    माझे जगणे होते गाणे 

    जाता जाता गाईन मी
    गाता गाता जाईन मी
    गेल्यावरही या गगनातील
    गीतांमधुनी राहीन मी

    माझे जगणे होते गाणे
    कधी मनाचे कधी जनाचे
    कधी घनाशय कधी निराशय
    केवळ नाद तराणे

    आलापींची संथ सुरावळ
    वा रागांचा संकर गोंधळ
    कधी आर्तता काळजातली
    केव्हा फक्त बहाणे

    राईमधले राजस कूजन
    कधी स्मशानामधले क्रंदन
    अजणातेचे अरण्य केव्हा
    केव्हा शब्द शहाणे

    जमले अथवा जमले नाही
    खेद खंत ना उरले काही
    अदृष्यातील आदेशांचे
    ओझे फक्त वाहणे

    – कुसुमाग्रज

    * * * *

     kusumagraj kavita in marathi

    डाव

    तिन्ही सांजच्या धुक्यात
    किती कळशी घेऊन
    कुंकाउ कापली भरून
    गेलीस तू

    वाट पाहून माझे
    शेवाळलेले डोळे
    पाय भयभीत वाले नदीकडे
    तेथे काळे तुझा डाव
    घाट पदे घाटावर
    रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी

    कुसुमाग्रज

    * * * *

    Kusumagraj Poems

     तिमिरातुनी तेजाकडे 

    तिमिरातुनी तेजाकडे...
    तिमिरातुनी तेजाकडे
    ने दीपदेवा जीवना ॥
    ज्योतीपरी शिवमंदिरी
    रे जागवी माझ्या मना ॥
    दे मुक्तता, भयहीनता
    अभिमान दे, दे लीनता
    दे अंतरा शुभदायिनी
    मलयनिलासम भावना ॥

    – कुसुमाग्रज

    * * * *

    बर्फाचे तट पेटुनि उठले 

    बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
    रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

    असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
    अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

    कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
    साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

    सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे
    रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

    एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे
    समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

    खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
    कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

    काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
    शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

    कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
    कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

    पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
    एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

    कुसुमाग्रज

    * * * *


     kusumagraj kavita in marathi

    जीर्ण पाचोळा 

    आडवाटेला दूर एक माळ
    तरू त्यावरती एकला विशाळ
    आणि त्याच्या बिलगूनिया पदास
    जीर्ण पाचोळा पडे तो उदास
    उषा येवो शिंपीत जीवनासी
    निशा काळोखी दडवु द्या जगासी
    सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
    मूक सारे हे साहतो बिचारा
    तरूवरची हसतात त्यास पाने
    हसे मुठभर ते गवतही मजेने
    वाटसरु वा तुडवीत त्यास जात
    परि पाचोळा दिसे नित्य शांत
    आणि अंती दिन एक त्या वनांत
    येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
    दिसे पाचोळा घेरुनी तयाते
    नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
    आणि जागा हो मोकळी तळाशी
    पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

    – कुसुमाग्रज

    * * * *

    Kusumagraj Poems

    चार होत्या पक्षिणी त्या 

    चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
    चार कंठी बांधलेली एक होती साखळी

    दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
    आणि एकीला कळेना जात माझी कोणती

    बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
    सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

    कोकिळेने काय केले ? गीत झाडांना दिले
    आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

    ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
    या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले

    – कुसुमाग्रज

    * * * *

    Kusumagraj Poems

    निरोप 

    गर्दीत बाणासम ती घुसोनि
    चाले, ऊरेना लव देहभान
    दोन्ही करांनी कवटाळूनीया
    वक्ष:स्थळी बालक ते लहान

    लज्जा न, संकोच नसे, न भीती
    हो दहन ते स्त्रीपण संगरात
    आता ऊरे जीवनसूत्र एक
    गुंतोनी राहे मन मात्र त्यात

    बाजार येथे जमला बळींचा
    तेथेही जागा धनिकांस आधी
    आधार अश्रूसही दौलतीचा
    दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

    चिंध्या शरीरावरी सावरोनी
    राहे जमावात जरा उभी ती
    कोणी पहावे अथवा पुसावे?
    एकाच शापातून सर्व जाती

    निर्धार केला कसला मानसी
    झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
    फेकूनिया बाळ दिले विमाने
    व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

    "जा बाळा जा, वणव्यातुनी या
    पृथ्वीच आई पुढती तुझी रे
    आकाश घेईं तुजला कवेंत
    दाही दिशांचा तुज आसरा रे"

    ठावे न कोठे मग काय झाले
    गेले जळोनीं मन मानवाचे
    मांगल्य सारे पडले धुळीत
    चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

    – कुसुमाग्रज

    * * * *

     kusumagraj kavita in marathi

    माझे जीवनगाणे 

    माझे जगणे होते गाणे
    सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
    तालावाचून वा तालावर
    कधी तानांची उनाड दंगल
    झाले सुर दिवाणे

    कधी मनाचे कधी जनाचे
    कधी धनास्तव कधी बनाचे
    कधी घनाशय कधी निराशय
    केवळ नादतराणे

    आलापींची संथ सुरावळ
    वा रागांचा संकर गोंधळ
    कधी आर्तता काळजातली
    केंव्हा फक्त बहाणे

    राईमधले राजस कूजन
    कधी स्मशानामधले क्रन्दन
    अजाणतेचे अरण्य केंव्हा
    केंव्हा शब्द शहाणे

    जमले अथवा जमले नाही
    खेद खंत ना उरली काही
    अदॄश्यातिल आदेशांचे
    ओझे फक्त वाहणे

    सुत्रावाचून सरली मैफल
    दिवेही विझले सभागॄहातिल
    कशास होती आणि कुणास्तव
    तो जगदीश्वर जाणे

    – कुसुमाग्रज

    * * * *

    Kusumagraj Poems

    अखेर कमाई

    मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे
    एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले.

    ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
    फ़क्त माळ्यांचा.

    शिवाजीराजे म्हणाले ,
    मी फ़क्त मराठ्यांचा.

    आंबेडकर म्हणाले ,
    मी फ़क्त बौद्धांचा.

    टिळक उद्गारले ,
    मी तर फ़क्त
    चित्पावन ब्राम्हणांचा .

    गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
    आणि ते म्हणाले ,
    तरी तुम्ही भाग्यवान.
    एकेक जातजमात तरी
    तुमच्या पाठीशी आहे.

    माझ्या पाठीशी मात्र
    फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

    – कुसुमाग्रज

    * * * *
    Kusumagraj Poems

    अजूनही 

    अजूनही
    निळया जांभळ्या नदीला

    आंबेवनाची सावली
    भेट पहिली वहिली

    अकल्पित
    ... भेट दुरस्थपणाची

    गर्भरेशमी क्षणाची
    सौदामिनीच्या बाणाची
    देवघेव.

    गुलबक्षीच्या फुलानी
    गजबजले कुपण
    वेचू लागला श्रावण
    मोरपिसे

    ओल्या आभाळाच्या खाली
    इद्रचापाचे तुकडे
    तुझा करपाश पडे
    जीवनास.

    कधी रेताडीचे रस्ते
    कधी मोहरली बाग
    कधी प्रासादास आग
    कर्पुराच्या

    सप्तसुरातुनी गेले
    माझ्या जीवनाचे गीत
    तुझ्या सारगीची तात
    साथ झाली.

    बर्फवाट शिशिराची
    आता पुढलिया देशी
    तुझ्या मिठीची असोशी
    अजूनही.
                                                           
       – कुसुमाग्रज

    * * * *

     kusumagraj kavita in marathi

    गाभारा 

    दर्शनाला आलात? या......
    पण या देवालयात, सध्या देव नाही

    गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
    सोन्याच्या समया आहेत, हिर्यांची झालर आहे.
    त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

    वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
    पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
    नाही......तस नाही, एकदा होता तो तिथे

    काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
    दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
    दोन तास वामकुक्षी घ्यायचा

    सार काही ठीक चालले होते.
    रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
    पडत होते पायाशी..

    दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
    मंत्र जागर गाजत होते
    रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
    बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

    सारे काही घडत होते.. हवे तसे
    पण एके दिवशी...... आमचे दुर्दैव
    उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

    कोणी एक भणंग महारोगी
    तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
    आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
    गाभारा रिकामा

    पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
    परत? कदाचित येइलही तो
    पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
    त्याला पुन्हा..

    प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
    आमच्या ट्रस्टींना,
    पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
    पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.

    तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
    कारण गाभारा सलामत तर देव पचास.
                                                                                 
     - कुसुमाग्रज

    * * * *
    Kusumagraj Poems     

    वादळवेडी 

    नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
    कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

    ... उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
    कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

    हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
    कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

    ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
    हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्या

     - कुसुमाग्रज

    * * * *


    हे पण वाचा 👇👇👇



    तर मित्रांनो , आज आपण Kusumagraj Poems In Marathi मध्ये बघितल्या . मला विश्वास आहे तुम्हाला हा कवितांचा संग्रह नक्की आवडला असेल आणि पुढे सुद्धा अश्या वेगवेगळ्या कविता वाचायला आवडतील . तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे मला कंमेंट मध्ये नक्की सांगा . अजून कवितांसाठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या .

    धन्यवाद !!!!!!!!!!!



    २ टिप्पण्या:

    Blogger द्वारे प्रायोजित.