-->

Header Ads

वैभव जोशी कविता संग्रह | Vaibhav Joshi Kavita Sangrah



नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण वैभव जोशी कविता संग्रह बघणार आहोत. वैभव जोशी यांच्या 14 सुंदर अशा कविता तुम्हाला इथे वाचायला मिळतील खूप भावनिक आणि सुंदर कवितांचा समावेश मी इथे केला आहे. तुम्ही पूर्ण वाचा त्या तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग वळूया कवितांकडे -

_____________


    कविता - 1

    मौन हवे की गलका... समजत नाही
    कैद हवी की सुटका... समजत नाही
    ऋतू बदलला हे कळले रे मित्रा
    कसा बदलला इतका... समजत नाही
    तोच स्वतःची किंमत सांगत सुटला
    मी तर त्याला हलका समजत नाही?!
    सैरावैरा धावत सुटले सगळे
    कुणी घेतला धसका... समजत नाही
    अजूनही मी मला आपला म्हणतो
    तुझ्याएवढा परका समजत नाही
    जो तो त्याचे दुःख मिरवतो आहे
    कशास इतका भपका... समजत नाही
    आज तुझी आठवण निघाली नव्हती
    तरी कसा हा ठणका... समजत नाही

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 2

    जेव्हा शाई म्हणते की
    बाकी काही राहू नये
    अशा वेळी खरं तर
    काही काही लिहू नये

    थांबू द्यावे शब्दांना
    ही कधी तरी मौनासाठी
    आपल्याच किनाऱ्याला
    पाण्यामध्ये पाहू नये...

    – वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 3

    ऋतुचक्रच होते केवळ
    नेमस्त वाटेल होते
    बरसेल जरासे आणिक
    थांबेल... वाटेल होते
    पण काय असे मेघांच्या
    डोळ्यांत साठले होते
    आभाळ नसावे, बहुधा
    काळीज फाटले होते...

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 4

    माझ्या डेस्कटॉप वर सेव्ह केलेल्या
    सर्व अर्धवट कवितांचे तुकडे
    पेंटब्रशमध्ये इंपोर्ट करता येतील का??
    आलेच तर ते सगळे जोडता येतील का?
    आलेच तर त्यातून एक चेहरा तयार होईल का?
    झालाच तर तो तुझा असेल का?
    आणि असलाच तर...
    मी आयुष्यात एक परिपूर्ण कविता
    लिहिलीअसं समजू का??

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 5

    जीवना...तू एकदा बोलायला ये.
    शेवटी काही फुले उचलायला ये,
    तू मला केव्हातरी भेटायला ये.

    उन्ह म्हणते सोडुनी जाऊ नको रे,
    चांदणे म्हणते मला बिलगायला ये.

    लाख नक्षत्रांत मी विसरून गेलो,
    लाख डोळ्यांनी मला वेचायला ये.

    सांगतो केव्हा कुठे चुकले तुझेही,
    जीवना तू एकदा बोलायला ये.

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖



    कविता - 6

    सृजनाच्या पाणवठ्यावर
    येतात प्रवासी पक्षी
    विजनावर तरंग उठतो
    डोळ्यात उमटते नक्षी

    सुख विधवा होते माझे
    अन् दुःख सवाष्ण होते
    भय इथले संपत नाही
    मज तुझी आठवण येते.

    मेघांच्या आडोशाने
    झाडात उतरते उन्हा
    कशिद्याला कळे कळे तो
    आतून उसवते वीण

    विषबाधित एकांताला
    जांभूळ निळेपण येते
    भय इथले संपत नाही,
    मज तुझी आठवण येते.

    - वैभव जोशी.

    ❖ ❖ ❖ ❖



    कविता - 7

    शब्दांच्या पलिकडले

    कॅनव्हासवर पाऊस चितारताना काही
    शिंतोडे तरी उडतात.
    बोटांना रंग तरी लागतो आणि
    त्यातूनही आपण कोरडे ठक्क राहिलो

    तरीही किमान कागद तरी भिजतो
    च्यायला...कॉम्प्युटरवर पेंटब्रशमध्ये पाऊस
    चितारून हेही घडत नाही.

    आजकाल तुला ई-मेल लिहिताना
    असंच काहीस वाटतं
    मी एखादा पाऊस
    पत्रातून पाठवू का?
    की तू आत्ता पुरती
    टू डायमेंशनल झालीआहेस?

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖



    कविता - 8

    दुःख नसता रडायचे नाही
    एवढे स्वस्त व्हायचे नाही

    रोज समजावतो गरीबी
    लाचार चौघात जायचे नाही

    वाटही पाहणार ना घरटे
    उंच इतके उडायचे नाही

    या कुणीही पुसायला अश्रू
    मात्र कारण पुसायचे नाही

    आज मी केवढा सुखी आहे
    आज काही सुचायचे नाही !!!

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 9

    हे झाड पाहिलंस?
    हे आधी एक बीज होतं फक्त....

    नशीबाने सुपीक जमीन मिळाली
    फिरत फिरत पाऊस इकडे डोकावला

    ऊन मेहेरबान झालं...आणि हे रुजलं
    झाड म्हणून नावारुपाला आलं

    हळूहळू याला वाटू लागलं,
    कीआपण जिथे रुजतो
    तीच जमीन सुपीक

    आपलं फुलणं ही तर पावसाची गरज
    आपण सुकलो तरच उन्हाला महत्व
    आता कधी तरी याच पावसाची किंवा
    वाऱ्याची लहर फिरली तर

    या सुपीक जमिनीतून ही
    मुळासकट उखडलं जाईल हे झाड
    आणि तेव्हा याला कोणी बीज
    म्हणूनही ओळखणार नाही
    हा कवी पाहिलास?
    हा आधी एक माणूस होता फक्त!!!

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 10

    एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
    ऊन् सारे झेलताना जी दिली छाया तुला

    आसवे ओवुन दिला दिला पाऊस
    जो डोळ्यांतला बोचरे काटे हजारो सोसुनी पायातळी.
    ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी

    त्या क्षणांचे का असे निर्माल्य व्हावे सांग ना
    एकंदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना

    मिरवल्या खोड्या तुझ्या अन दोष माथी घेतले
    लावण्या माया तुला काळीज हाती घेतले

    बोबड्या बोलांत माझे मिसळले मी सूर ही
    कागदी नावेत बसुनी पार केले पूर ही

    त्या क्षणांना का किनारे ना मिळावे सांग ना
    एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना

    कोण जगतो घेउनी श्वासांत लाखो वादळे
    कोण मरतो आपल्यासाठी कुणाला ना कळे

    देऊनी वरदान आपण शाप व्हावे लागते
    बाप समजुन घ्यायचा तर बाय व्हावे लागते

    त्या क्षणाचे कर्ज हे केव्हा फिटावे सांग ना
    एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖



    कविता - 11

    चित्र

    चित्र काढ म्हणालीस तेव्हा
    कविता लिहीत बसलो

    कविता लिही म्हणालीस तेव्हा
    नुसताच शून्यात बघून हसलो

    शून्यात बघू नकोस
    म्हणालीस तेव्हा
    तुझ्या डोळ्यांत बघत होतो
    तुझ्याप्रमाणे नाही तरी
    माझ्यापरीनं जगत होतो

    ह्याला काय जगणं म्हणतात का
    म्हणालीस तेव्हा अनेक मरणं
    भोगून झाली होती
    तुला भोग कळे कळतो

    वासना वेशीवर टांगून झाली होती
    वेस कुठंय म्हणालीस तेव्हा
    वेशीपल्याड गेलो होतो
    तू रे कोण? म्हणालीस तेव्हा
    मी तर तूच झालो होतो

    आता तू ही डोळे असून
    डोळ्यांदेखत विरते आहेस
    माझी कविता भाळी गोंदून
    चित्र म्हणवत फिरते आहेस

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 12

    उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे
    लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे

    दरवळायला लागली ही शांतता दोघांतली
    केवढे गंधाळले गंधाळले माझे तुझे

    हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो
    आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे

    उजळला एका क्षणी दोघांतला काळोख हा
    एकमेकांतून आता तेवणे माझे तुझे

    दोन क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा
    सोसले नाही ऋतूंना थांबणे माझे तुझे

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 13

    एक होकार दे फार काही नको,
    फार काही नको फक्त नाही नको

    एकदा दोनदा ठीक आहे सखे
    पण तुझे लाजणे बार-माही नको
    एक होकार दे फार काही नको

    थेट स्पर्शातूनी बोल काहीतरी ,
    गूढ शब्दातली मौन ग्वाही नको
    फार काही नको फक्त नाही नको

    आपले भटणे हीच कोजागिरी,
    चांदणे ही नको, चांदवा ही नको
    एक होकार दे फार काही नको..

    - वैभव जोशी.

    ❖ ❖ ❖ ❖


    कविता - 14

    जीवना तू एकदा बोलायला ये...
    शेवटी काही फुले उधळायला ये
    तू मला तेंव्हातरी भेटायला ये

    ऊन्ह म्हणते सोडुनी जाऊ नको रे
    चांदणे म्हणते मला बिलगायला ये

    लाख नक्षत्रांत मी विखरून गेलो
    लाख डोळ्यांनी मला वेचायला ये

    सांगतो केंव्हा कुठे चुकले तुझेही
    जीवना तू एकदा बोलायला ये

    - वैभव जोशी

    ❖ ❖ ❖ ❖


    ✅हे पण नक्की वाचा👇👇👇
    ______________


    👀तर आज या पोस्टमध्ये वैभव जोशी कविता संग्रह बघितले. तुम्हाला कोणत्या कवीचा कवितासंग्रह हवा असेल तर खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्द्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

    ______________


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.