छान छान बालगीते | Chan Chan Baalgeete (Marathi)
![]() |
छान छान बालगीते |
छान छान बालगीते
👦💜💜💜👧
डराव डराव
डराव डराव !! डराव डराव !!
का ओरडता उगाच राव ??
पत्ता तुमचा नव्हता काल
कुठून आला ?? सांगा नाव
धो धो पाऊस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली आमची नाव
आणिक तुमची डराव डराव !!
बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव !!
सांगा तुमच्या मनात काय
ही घ्या छत्री ही घ्या नाव
जा गावा जा आपुला गाव
आणि थांबवा डराव डराव !!
चिमुकलं
चिमुकलं पाखरू, अंगणात आलं
दाणे टिपले, नाचून गेलं
चिमुकलं ऊन, दारातून आलं
भिंतीवर कवडसा, पाडून गेलं
चिमुकलं वारं, झाडात हललं
फांदीवरचे पान, पान डूललं
चिमुकलं बाळ, रांगत आलं
मांडीवर बसलं, खुदकन हसलं
बिचारी मनी
एकदा झाली गंमत मोठी
मनीला मिळाली दुधाची लोटी
लोटीत दूध भरून ठेवलं
अन मनीला स्वप्न पडलं
स्वप्नात दिसलं उंदराचं गाव
गावात होते झाडांना पाव
माऊ च्या तोंडाला सुटलं पाणी
गात सुटली मोठ्याने गाणी
उंदीर पाहून पोट भरलं ढब्ब
मनीन मोठी ढेकर दिली अब्ब
फेर धरून नाचत सुटली
दुधाची लोटी खालीच सांडली
उंदीर राहिले स्वप्नात दूध आलं उशाशी
बिचारी मनी झोपली तशीच उपाशी
वेड कोकरू
वेड कोकरू खूप थकलं
येताना घरी वाट चुकलं
अंधार बघून भलतच भ्याल
दमून दमून झोपेला आलं
शेवटी एकदा घर दिसलं
वेड कोकरू गोड हसलं
डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत
या रे या ... सारे या ....
या रे या ... सारे या ....
गप्पागोष्टी मारू या ....
या रे या ... सारे या ....
खोड्या आपण काढूया ....
यारे या .... सारे या.....
पकडापकडी खेळूया .....
या रे या ... सारे या ....
पाटीवरती पेन्सिल गिरवूया ...
या रे या ... सारे या ....
जोरजोरात उड्या आपण मारुया ....
या रे या .... सारे या .....
मस्तीची शाळा भरवूया ....
या रे या ... सारे या ....
हसत खेळत गाणे आपुले गाऊया ....
मनीमाऊ
मनीमाऊ, मनीमाऊ
अंग तुझे किती मऊ
डोळे तुझे, घारे घारे,
मिशी वरून जीभ फिरे
मखमलीचे मऊ पाय
चालून चालून थकले काय ??
पाऊले तुझे वाजेना
चाहूल काही लागेना
गुपचुप येऊन बसतेस कशी ??
डोळे मिटून बघतेस कशी ??
इवले इवले तुझे कान
उभे करून ऐकतेस काय ??
उंदीर मामा बिळात बाई
आता बाहेर यायचा नाही
चवळीचे गाणे
अटक मटक चवळी चटक
चवळी पाण्यात भिजली,
बराच वेळ शिजवली,
चवळी काही भिजेना
पाण्यात मळी शिजेना
चवळी होती कडक खूप
म्हणून तिला दिलं तूप
अटक मटक चवळी चटक !!
आता तरी भिजेल का ??
सांग मला शिजेल का ??
ससा
एक होता ससा
सांगा पाहू कसा ??
पांढरा पांढरा रंग
अन मऊ मऊ अंग
मोठे मोठे कान
लाल लाल डोळे छान
काय बरे खातो ??
लठ्ठ मात्र दिसतो
असा हा ससा
धिट नाही तसा
चाहुल लागताच पळतो
झाडाझुडपात लागतो
तुरुतुरु हयाची चाल
पहाल तर थक्क व्हाल
असा हा ससा
हयाला खूप खूप हसा.
शाळा सुटली
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मग हवीच गोळी
किंवा दे ग खमंग चकली
दे ना लवकर भूक लागली
सायंकाळी जाऊ दे मला
पटांगणावर खेळायला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
फुलपाखरू
फुलपाखरू !!
छान किती दिसते फुलपाखरू !!
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते फुलपाखरू !!
पंख चिमुकले निळे जांभळे
हलवून झुलते फुलपाखरू !!
डोळे बारीक करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते फुलपाखरू !!
मी धरू जाता येईना हाता
दूरच उडते फुलपाखरू !!
भरली सभा
जमले पक्षी, भरली सभा
कावळा करतो काव काव
एटीत म्हणतो, आईस्क्रीम लाव
चिमणी करते, चिऊ चिऊ
म्हणते कशी, लाडू खाऊ
पोपट करतो विठू विठू
चला रे चला पेरू वाटू
मोर म्हणतो मीयाओ मीयाओ
मिठाई लाओ पेढे खाओ
कोकीळ करतो कुहू कुहू
चला रे चला कॉफी पिऊ
असरट पसरट केळीचे पान
असरट पसरट केळीचे पान,
चिंगीने केला स्वयंपाक छान
काढला केर धुतले हात
मांडला पाट घेतले पाणी
भात वरण लिंबाची फोड
भाजी पुरी बासुंदी गोड
वाढली पानात वाढली दाटीत
माऊ बसली जिभल्या चाटीत
जेवा जेवा भरपूर जेवा
पोट भरून ढेकर द्या
गजरा
वेलीवरी फूलांऐवजी
फुलांतील फुलपाखरे
निळे जांभळे पिवळे दिसतील
रंग किती गोजिरे !!!!
भरभर खुडूनी फुलपाखरे
गजरा मी गुंफिन
निळी जांभळी पिवळी शोभा
वेणी वरी माळीन !!!!
आजी
एक होती आजी
शोधू लागली भाजी
परसात होता भोपळा
वेली वरती झोपला
आजीला हवासा वाटला
हळूच देठ कापला
घरात आली आजी
भोपळ्याची केली भाजी
भाजी घेतली ताटात
भोपळा गेला पोटात
उंदीर मामा उंदीर मामा
उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
मोठे मोठे पोट त्याचे सुपा सारखे कान
हाता एवढे लांब नाक तरी दिसते छान
पोटाला गुदगुती त्याच्या नको करत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
पिवळे पिवळे धोतर त्याच्या पोटावर नाग
मांडीवर चढू नकोस त्याला येईल राग
पायावर उड्या सारख्या मारत नको जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
डोक्यावर मुकुट त्यात आहे बघ हिरा
बाप्पा तुला ओरडेल अरे जपून राहा
जरा पाठीमागे त्याचा नको फिरत राहू
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ
बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ
गाडी आली गाडी आली
गाडी आली गाडी आली झुक झुक झुक |
शीटी कशी वाजे बघा कुक कुक कुक || 1 ||
इंजिनाचा धूर निघे भक भक भक |
चाके पाहू तपासून ठक ठक ठक || 2 ||
गाडीमध्ये बसा चला पट पट पट |
सामानही ठेवा सारे चट चट चट || 3 ||
तिकिटाचे पैसे काढा छान छान छान |
गाडीची हो घंटा वाजे घन घन घन || 4 ||
जायचे का तुम्हा कुठे भुर भुर भुर |
कुठेही जा नेई तुम्हा दूर दूर दूर || 5 ||
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Apdi Thapdi Gulachi Papdi Lyrics
- Lahan Mazi Bahuli Mothi Tichi Savli Lyrics
- Sang Sang Bholanath Lyrics
- Nach Re Mora Ambyachya Vanat Lyrics
- Badbad Geete Marathi Lyrics
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment