Header Ads

बहिणाबाई चौधरी कविता संग्रह | Bahinabai Chaudhari Yanchya Kavita

 

नमस्कार मित्रानो, बहिणाबाई चौधरी या मराठी भाषेतील अत्यंत प्रसिद्ध अशा कवींपैकी एक आहेत. जरी त्या अशिक्षित असल्या तरी त्यांच्या कवितांमध्ये विद्वानांना लाजवेल अशी प्रगल्भता आणि एक जिवंतपणा होता. बहिणाबाईंचा जन्म जळगावाजवळील असोदे ४ ऑगस्ट १८८० गावात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्यांच्या अनेक कविता नष्ट झाल्या.त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी आणि त्यांच्या मावसभावाने त्या गट असलेल्या कविता टिपून ठेवल्या. म्हणून आज त्या आपल्याला वाचायला मिळत आहेत. वयाच्या ७१ व्य वर्षी बहिणाबाईंचा मृत्यू झाला. पन त्यांचे काव्य हे कायमचे अमर झाले आहे. चला तर मग बघूया बहिणाबाई चौधरी यांच्या कविता -



    1. कशाला काय म्हणू नही


    बिना कपाशीनं उले त्याले बोन्ड म्हणू नही
    हरिनाम इना बोले त्याले तोंड म्हणू नही

    नही वाऱ्यानं हललं त्याले पान म्हणू नही
    नही एके हरिनाम त्याले कान म्हणू नही

    पाटा विहिरीवाचून त्याले मया म्हणू नही
    नही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नही

    निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नही
    आखडला दानासाठे त्याले हात म्हणू नही

    नही वळ्खला कान्हा तिले गाय म्हणू नही
    नही फुटे कधी पान्हा तिले माय म्हणू नही

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    2. सदा जगाच्या कारणी


    सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला
    अरे सोतामधी त्याले देव दिसला दिसला

    सोता झाला रे दगड घाव टाकीचा सोसला
    अरे दगडात त्याले देव दिसला दिसला

    डोये मिटले सोताले बी इसरला
    अरे अंधारात त्याले देव दिसला दिसला

    माले कयाले गुपित काय तुझी करामत
    अरे अंधारानं केली उजेडाच्या वर मात

    देव कुठे, देव कुठे ? तुझ्या बुबया माझार
    देव कुठे, देव कुठे ? अभायाच्या आरपार !!!

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    3. नको नको जोतिषा


    नको नको जोतिषा माझ्या दारी नको येऊ |
    माझे दैवत मला कळे माझा हात नको पाहू ||

    धनरेषेच्या चऱ्यांनी तळहात रे फाटला |
    देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला ||

    म्हणे नशिबाचे नऊ ग्रह तळहाताच्या रेघोट्या |
    बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या ||

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    4. मन वढाय वढाय


    मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर
    किती हाकला हाकला फिरी येत पिकावर

    मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा
    जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावऱ्हल्या रे लाटा

    मन लहरी लहरी त्याले माती धरे कोण
    उंडारलं उंडारलं जस वारा वहावन

    मन जह्यरी जह्यरी याच तयार रे तंतर
    अरे इचू, साप बारा त्याले उतारे मंतर

    मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
    आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात

    मन चपय चपय त्याले नही जरा धीर
    तेथे व्हयीसनी इज आलं आलं धरतीवर

    मन एवढं एवढं जसा खकसाचा पाना
    मन केवढं केवढं आभायात बी मायेना

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    5. अरे मी कोण ?


    अरे मी कोण, मी कोण ? आला माणसाले ताठा
    सर्व्या दुनियेत आहे माझ्याहून कोण मोठा ?

    अरे मी कोण, मी कोण ? बोले भुकेलं मी पन
    तवा तोंडातला घास म्हणे, तू कोण तू कोण ?

    अरे मी कोण, मी कोण ? जावा लागली तहान
    ताव पाण्याचा घुटका म्हणे तू कोण तू कोण ?

    अरे मी कोण, मी कोण ? माझ्या मुखी हरिनाम
    तुझ्या जीभेले इचार मधी बोले आत्माराम

    अरे मी कोण, मी कोण ? मीपणाची मारीमाय
    देख इची कशी तऱ्हा सोता सोतालेच खाय

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    6. अरे खोप्यामधी खोपा


    अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
    देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला

    पिल्लं निजली खप्यात जसा झुलता बंगला
    तिचा पिल्लांमध्ये जीव जीव झाडाले टांगला

    खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा
    पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा

    तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
    तुले दिले रे देवानं दोन हात दहा बोट

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    7. पेरणी पेरणी


    पेरणी पेरणी आले पावसाचे वारे
    बोलला पोपया तुम्ही पेरते व्हा रे ....

    पेरणी पेरणी आले आभायात ढग
    ढग बकादि इज करे झगमग

    पेरणी पेरणी कारे आभायात गडगड
    बरस बरस माझ्या उरी रे धडधड

    पेरणी पेरणी काढा पांढरी मोघडा
    झाडीन तो झाड कव्हा बरसाती चौघडा

    पेरणी पेरणी आला धरतीचा वास
    वाढे पेरणीची शेतकऱ्या तुझी आस

    पेरणी पेरणी आता मुरुग बी सरे
    बोले हा पोपया तुम्ही पेरते व्हा रे

    पेरणी पेरणी भिज भिज धरती माते
    बियाबियाण्यांचे भरुनी हो ठेवले पोते

    पेरणी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी
    धोरणांची चारनी कोटी पोटाची भरणी

    पेरणी पेरणी देवा तुझीच करणी
    दैवाची हेरनी माझ्या जीवाची झुरणी

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    8. माझी माय सरसोती


    माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
    लेक बहिणीच्या मनी किती गुपिते पेरली

    माझ्यासाठी पांडुरंगा तूच गीता भागवत
    पावसात सामावत माटीमधी उगवत

    अरे देवाचं दर्सन झालं झालं आपसूक
    हिरिदात सुर्यबापा दाई अरुपाचं रूप

    तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
    देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी

    फुलामधीं सामावला धरत्रीचा परिमय
    माझ्या नाकाले इचारा नाथनीले त्याच काय ?

    किती रंगविशी रंग भरले डोयात
    माझ्यासाठी शिरीरंग रंग खेये आभायात

    धरतीमधल्या रसानं जीभ माझी सवादते
    तवा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *

    9. पहिला पाऊस


    आला पहिला पाऊस शिंपडले भुई सारी |
    धारात्रीचा परिमय माझं मन गेलं भरी ||

    आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस |
    वर येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस ||

    देवा पाऊस पाऊस तुझ्या डोयातली आस |
    देवा तुझी रे हारास जिवा तुझी रे मिरास ||

    - बहिणाबाई चौधरी

    * * * * * *



    हे पण वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बघितल्या. तुम्हाला यातली कोणती कविता आवडली ते मला कमेंट मध्ये सांगा आणि अन्य मराठी कविता आणि लिरिक्स साठी ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!





    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.