सावित्रीबाई फुले कविता | Marathi Poems On SavitriBai Phule
नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी टाकला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावामध्ये झाला. नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह तेरा वर्षांच्या जोतिबा फुले यांच्याशी १८४० मध्ये झाला. समाजातील अमानुष रूढी परंपरांचा जोतिबा फुले यांनी तीव्र विरोध केला आणि सावित्रीबाई फुलेंनी पूर्ण त्यांना पूर्ण साथ दिली सोबतच स्त्रियांना शिक्षणाचा मार्गही त्यांनी महिलांसाठी शाळा खोलून सुरु केला. या सर्व कार्यामध्ये त्यांना असंख्य कष्ट समाजविरोध पत्करावा लागला. पण त्यांना न जुमानता ते समाजासाठी शेवटपर्यंत झटत राहिले. या पोस्ट मध्ये आपण सावित्रीबाई फुले कविता बघणार आहोत.इथे आपण सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित कविता बघणार आहोत.
सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती , ज्ञानज्योती अशा टोपण नावाने ओळखले जाते. त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी जो सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आहे तो बालिकादिवस म्हणून साजरा केला जातो. चला तर मग वळूया कवितांकडे -
![]() |
सावित्रीबाई फुले कविता |
सावित्रीबाई फुले कविता
आज इथे आपण सावित्रीबाईंच्या कार्याचे आणि जीवनाचे वर्णन करणाऱ्या कविता बघणार आहोत. सावित्रीबाई पण एक कवियत्री होत्या त्यांच्या कविता पण आपण नंतर कधी तरी बघू.1. सावित्री तू होतीस म्हणून
सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला
तू होतीस म्हणून ..... माझ्या जगण्याला अर्थ आला
शिक्षित झाली, ज्ञान मिळाले भयमुक्त झाली नारी
तू पाया जगाचा , तुजवर उभी दुनिया सारी
बेटी - बेटा समान सारे , तू कायदा असा केला || १ ||
तू होतीस म्हणून ..... माझ्या जगण्याला अर्थ आला
सावित्रीच्या लेकी आम्ही तू आई समद्यांची झाली
चाल मर्दानी तुझी रुढवाट तुजला भ्याली
लाथाडलास अंधार तू आणि उजेड आम्हा दिला || २ ||
तू होतीस म्हणून ..... माझ्या जगण्याला अर्थ आला
तू प्रेरणा स्त्रीत्वाची तू लढलीस लढाई माझी
जग बदलण्यास मी वारस होईल तुझी
तुझ्यामुळेच माझ्या सृजनाचा सम्मान झाला || ३ ||
तू होतीस म्हणून ..... माझ्या जगण्याला अर्थ आला
- डॉ. हनुमंत भवारी
2. जिच्यामुळे शिकली दीन
जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुली अन मुले
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले || धृ ||
होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ ,
महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार .........
त्यांच्यासाठी तिने ज्ञानाचे द्वार केले खुले || १ ||
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
महिला शिक्षणाची किंमत तिला कळली होती ,
म्हणून तर अंगावर झेलली चिखल अन माती ......
धर्माच्या ठेकेदाराला आव्हान तिने दिले || २ ||
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान
वाढविला जगती महिला वर्गाचा सम्मान ..........
स्त्री शिक्षणासाठी तिने आपले आयुष्य वाहिले || ३ ||
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुली अन मुले
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले || धृ ||
3. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला ..... सावित्री तू उजळवलेस !!
क्रांतीज्योती ज्ञानज्योती ...... दिनाची खरी माय तू !!!!
सोसूनी अनंत यातना ...... शिकविलेस तू स्त्रियांना !!
धन्य धन्य होतो आम्ही ......... थोरवी तुझी गाताना !!!!
अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात ......... कैद होती नारी !!
संकटाशी करून सामना ......... तू मुक्त केलीस नारी !!!!
सावित्री तुझ्या लेकी आज ......... जगात कर्तृत्व गाजवत आहेत !!
ज्ञानाच्या विशाल नभात ......... मुक्त भरारी घेत आहेत !!!!
4. सावित्रीच्या ओव्या
पहिली माझी ओवी ग , सावित्रीच्या जिद्दीला
अशिक्षित अडाणी .... पतीपाशी शिकली !!
दुसरी माझी ओवी ग , सावित्रीच्या बुद्धीला
स्त्रियांच्या शिक्षणाचा .... पाया तिने घातला !!
तिसरी माझी ओवी ग , सावित्रीच्या धैर्याला
दगडगोटे खाऊनी ..... शाळा तिने चालवली !!
चौथी माझी ओवी ग , सावित्रीच्या मनाला
विधवा अनाथांचा ..... सांभाळ तिने केला !!
पाचवी माझी ओवी ग , तिच्या थोर हृदयाला
माणुसकीचा झरा ....... त्यात नित्य ग वाहिला !!
स्मरण तुझे करुनि , वसा मी घेतला .......
भगिनींना जागवीन , संघटित करिन ,
ज्ञानज्योत लावीन , हेचि तुला स्मरण !!!!
5. डोंगरवाटा तुफान लाटा
डोंगरवाटा तुफान लाटा , तमा नसावी काही
ठाम असावा मार्ग आपुला दिशादिशातून दाही
स्मरण करावे क्रांतिज्योतीचे वाचुनी इतिहासाला
स्वातंत्र्याचा खरा अर्थ मग कळेल अक्षराला
हाती लेखणी आमुच्या नसती जर का आली तेव्हा
कळले नसते सूर्य उगवला नभोमंडपी केव्हा
या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी
तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी
वंदन तिजला करूया सारे कर जोडुनी आता
तिच्याच चरणी झुकता राहो , माझा तुमचा माथा
6. नायगावात जन्मले नक्षत्र
नायगावात जन्मले नक्षत्र , जणू अवतरलं रात्री चांदणं
खंडोजी नेवासे पाटलाच्या घरी , आले जन्माला कन्यारत्न
समजला दिली नवी दिशा , ज्योतिबाची बनून ज्योत
देऊन स्वतंत्र विचारांचा , लढा जगाला केले नतमस्तक
उभयांताने जाणले दुःख , अज्ञानाचे होते इथं धुकं
दूरदृष्टी त्यांना जगावेगळी , साथ होती एकमेकांची
तळमळ ओटी दीन दुबळ्यांची हाती ढाल प्रगल्भ विचारांची
पतीच्या लावून खांद्याला खांदा , ती झाली पहिली स्त्री शिक्षिका
केशवपन अन बालविवाहाला घातला आळा
केला अस्पुश्यांना जलाशय मोकळा , झुगारून समाजाचा विरोध
अखंडपाने चालवले हे व्रत , उचलून ज्ञान दानाचा विडा
हरळी या समाजाची पीडा न केली जीवाची पर्वा
चालवला पतीचा वसा , बनली समाजाची ती प्रेरणा
हक्क दिला माणसाला मनुष्यत्वाचा
-सौ . प्रतिभा कापुरे- इंगळे
7. शिक्षणातूनच घडली सावित्रीबाईंची नात
राष्ट्रपती नि कलेक्टर , जीवन देणारी डॉक्टर
शिक्षणातूनच घडली सावित्रीबाईंची नात
अनिष्ट प्रथांची कडी पायांमध्येच होती बेडी
गुलामीला झुगारून समतेचे युद्ध छेडी
क्रांतिज्योतीच्या कष्टाने आली हि प्रभात
शिक्षणातूनच घडली सावित्रीबाईंची नात
तुझी शान तुझं सुख सावित्रीमाईचं देणं
शिकून शोभत नाही गुलामी लादून घेणं
ज्योतींबांची दिली साथ केला प्रथांवरी आघात
शिक्षणातूनच घडली सावित्रीबाईंची नात
पोरी धीर सोडू नको कधी जोडू नको हात
कष्टाने आणि सत्याने कर संकटावरी मात
अशी विद्येने मोठी हो कर दोन्ही घरांचा उद्धार
शिक्षणातूनच घडली सावित्रीबाईंची नात
8. अशा या क्रांतिज्योतीचं आम्हास अभिमान
आदरणीय सावित्रीबाईंना करूया नमस्कार
त्यांच्यामुळेच मिळाला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार
मुलींसाठी शिक्षणाची खुली केली दारे
स्त्रियांचे आयुष्य बदलून गेले सारे
ज्योतीबांची घेऊन प्रेरणा उभारली पहिली शाळा
स्त्रियांच्या उन्नतीचा केला मार्ग मोकळा
शेण दगड समाजाचा किती सोसला त्रास
स्त्रियांच्या उद्धारासाठी भोगीला वनवास
पंखांमध्ये दिले बळ घेण्या उंच भरारी
स्वतःच्या पायावर उभी अभिमानाने आज नारी
पहिली स्त्री शिक्षिका मिळविला त्यांनी मान
अशा या क्रांतिज्योतीचं आम्हास अभिमान
- सौ. मनीषा रवींद्र मालुसरे
9. एक ज्योत क्रांतीची
एक ज्योत क्रांतीची अन पेटल्या लाखो मशाली
तलवार घेऊनि विद्येची लढली सावित्री माऊली
काळ असा तो होता स्त्री अज्ञानी होती
चूल मूल आयुष्य तिचे उंबरठ्या आत कहाणी होती
क्रांतिसूर्याची साथ लाभली सावित्रीमाईंनी अक्षरे गिरवली
प्रत्येक स्त्रीला करायचे साक्षर खूणगाठ मग तिने बांधली
गोष्ट पण ती सोपी नव्हती खाचखळग्यांची वाट होती
चिखल दगडांचे वार झेलुनी मुलींना ती शिकवत होती
कैक कळा तिने सोसल्या पण जराही नाही खचली
मुलींसाठी काढून शाळा परिस्थिती तिने बदलली
शिकली स्त्री अन साक्षर झाली अज्ञानाची छाया सरली
जग उंबरठ्या बाहेरचे प्रत्येक स्त्री पाहू लागली
ध्यास जगावेगळा होता त्यासाठी आजीवन लढली
म्हणूनच वंदनीय आम्हाला आमची सावित्री माऊली
10. आयुष्य वेचले तुम्ही अज्ञानाच्या निर्मूलनासाठी
आयुष्य वेचले तुम्ही अज्ञानाच्या निर्मूलनासाठी |
झटत राहिलात तुम्ही समस्त स्त्री वर्गाच्या शिक्षणासाठी |
कार्य केले तुम्ही स्त्रियांच्या गुलामगिरीतून मुक्तीसाठी |
आयुष्य व्यतीत केले तुम्ही रूढी परंपरेतून मुक्तीसाठी |
दगड धोंडे अन शेणाचा मार झेललात तुम्ही समाजाच्या सेवेसाठी |
ज्योतिरावांच्या साथीने कार्य केले तुम्ही समाजाच्या उद्धारासाठी |
तुम्ही दीनांचा प्रसारासाठी चंदनाप्रमाणे झिजत राहिलात |
तुम्ही समाज प्रबोधनासाठी प्रतिगामी समाजच्या |
विरोधात गेलात तुम्ही स्त्रियांच्या उन्नतीसाठी |
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढलात
तुम्ही शोषित वंचित समाजसाठी |
सतत कार्यरत राहिलात तुम्ही महाभयंकर प्लेगच्या रुग्णांसाठी |
शेवटी मृत्यूही आला समाजसेवेचं व्रत पूर्ण करण्यासाठी |
घेऊनि सावित्रीचा वसा कार्य करूया ज्ञानाच्या प्रसारासाठी |
प्राप्त करुनि सावित्रीची प्रेरणा कार्य
करूया स्त्रियांच्या सम्मानासाठी |
चला मार्गक्रमण करूया नवीन युगाच्या निर्मितीसाठी |
आज सावित्रीमाईंचे स्मरण करूया त्यांच्या अजरामर कार्यासाठी |
ज्ञानज्योती क्रांतीज्योती ची जयंती साजरी करूया
त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी |
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले कविता बघितल्या. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि अजून कोणत्या विषयावरील कविता पाहिजे ते पण नक्की सांगा.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!!
Post a Comment