Sant Dnyaneshwar Abhang In Marathi | संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग (मराठी )
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Sant Dnyaneshwar Abhang In Marathi मध्ये वाचायला मिळतील . काही निवडक असे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत .
अधिक देखणें तरी | Adhik Dekhane Tari
अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।
योगिराज विनविणें मना आलें वो माये
देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणें समाधान मज जोडलें वो माये
अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये
पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये
⁕ ⁕ ⁕ ⁕
अवचिता परिमळू | Avachita Parimalu
अवचिता परिमाळू झुळकला अळुमाळू
मी म्हणे गोपाळू आला गे माये
चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करू
तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू
लावण्य मनोहरू देखियेला
बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये
बाप रखुमादेवी वरू विठ्ठल सुखाचा
तेणे काया मन वाचा वेधियेलें
⁕ ⁕ ⁕ ⁕
आजी सोनियाचा दिनु | Aaji Soniyacha Dinu
आजी सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
दृढ विटे मन मुळी विराजित वनमाळी
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
बरवा संत-समागमु प्रगटला आत्मारामु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
कृपासिंधु करुणाकरु
बापरखुमादेवीवरु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
⁕ ⁕ ⁕ ⁕
अवघाचि संसार सुखाचा | Avaghachi Sansar Sukhacha
अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपूरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।
सर्व सुकृताचे फळ मी लिहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३।।
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनि राहे ।।४।।
⁕ ⁕ ⁕ ⁕
पांडुरंगकांती दिव्य तेज | Pandurang Kanti Divya Tej
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । येणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाऊलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।ह्मणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
जंववरी रे तंववरी | Janvavari Re Tanvavari
जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥
जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥
जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद ।
जंव अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥
जंववरी तंववरी युद्धाची मात ।
जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥४॥
जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना ।
जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥
जंववरी तंववरी बाधी हा संसार ।
जंव रखुमादेविवर देखिला नाहीं बाप ॥६॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
एक तत्व नाम दृढ धरी मना
एक तत्व नाम दृढ धरी मना
हरी सी करुणा येईल तुझी ॥१॥
ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद
वाचेसी सदध जपे आधी ॥२॥
नामा परते तत्व नाही रे अन्यथा
वाया आणि का पंथा जासी झने ॥३॥
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी
धरूनी श्रीहरी जपे सदा ॥४॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
तुझी या निडळी कोटी चंद्र प्रकाशे
तुझी या निडळी कोटी चंद्र प्रकाशे
कमल नयन हास्य वदन हासे ॥१॥
कृष्णा हाल कारे कृष्णा डोल का
रेघडी ये घडी ये गुज बोल का रे ॥२॥
उभा राहुनिया कैसा हालवितो बाहो
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु ना हो ॥३॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुझ ध्यान कळू आले ॥१॥
तुझा तुझी देव तुझा तुझी भाव
फिटला संदेह अन्य तत्वी ॥२॥
मुरडूनिया मन उपजलासी
चित्ते कोठे तुझे रिते न दिसे रया ॥३॥
दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ती आपणांसकट
अवघेची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥
निवृत्ती परमाणुभव नेमा
शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
देवाचिया दारी उभा क्षणभरी
देवाचिया दारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधी लिया ॥१॥
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनी संसारी जिव्हे वेगु करि
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचीये खुणे
द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥४॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
तुज सगुण म्हणो | Tuj Sagun Mhano
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
सगुण निर्गुन रे एकू गोविंदु रे ॥१॥
अनु माने ना अनु माने ना
श्रुतीनेती नेती म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थूळ म्हणो की सुक्ष्म रे
स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारू म्हणो की निराकारू रे
आकारून इरा करू एकू गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणो की अदृश्य रे
दृश्यअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
तुज व्यक्त म्हणू की अव्यक्तु रे
व्यक्त अव्यक्त ऐकू गोविंद रे ॥६॥
निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले बाप
रखुमा दे विवरू विठ्ठल रे ॥ ७ ॥
⁕ ⁕ ⁕ ⁕
- आता कोठे धावे मन Lyrics
- संत मुक्ताबाईचे अभंग
- गुरुपरंपरेचे अभंग
- एकनाथ महाराजांचा अभंग संग्रह
- संत तुकाराम महाराजांचा अभंग संग्रह
तर मित्रानो ,आज या पोस्ट मध्ये आपण Sant Dnyaneshwar Abhang In Marathi बघितले . अश्याच भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुनः भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!
धन्यवाद !!!!!!
Post a Comment