Header Ads

Bhulabai Che Gane | भुलाबाईचे गाणे | भोंडला



मित्रानो, महाराष्ट्रातील घराघरामध्ये भुलाबाई/ भोंडला हा सण साजरा केला जातो . भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई बसवल्या जातात. जशी काही अंतरावर भाषा बदलते तशी हा सण साजरा करण्याच्या पद्धती देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. 

Bhulabai Che Gane
Bhulabai Che Gane


          पश्चिम महाराष्ट्रात याला हादगा, कोकणात भोंडला तर विदर्भामध्ये हा सण भुलाबाई या नावाने ओळखला जातो. पद्धती जरी वेगवगेळ्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी भोंडल्याची/ भुलाबाईची Bhulabai Che Gane गाणी म्हटली जातात. नंतर भुलाबाईची आरती केली जाते आणि शेवटी प्रसाद ( खिरापत ) वाटतात. आज आपण यावेळी बोलली जाणारी काही भुलाबाईची गाणी बघणार आहोत. इथे मी छोटी आणि सोपी गाणी तुमच्यासाठी आणली आहेत. चला मग बघूया भुलाबाईची गाणी -


    १. शिंक्यातलं लोणी खाल्लं कोणी


    शिंक्यातलं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी ??
    तेच खाल्लं वाहिनीने वाहिनीने
    आता माझे दादा येतील दादा येतील
    दादाच्या मांडीवर बसिन बसिन
    दादाला सांगेल दादा तुझी बायको
    चोरटी चोरटी
    घे हाती लागावं काठी
    घराघराची लक्ष्मी मोठी



    २. अक्कण माती चिक्कण माती


    अक्कण माती चिक्कण माती चिक्कण मातीचा गोळा
    असा गोळा सुरेख बाई, ओटा तो घालावा

    असा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं
    असा जातं सुरेख बाई, गहू ते दळावे

    असा गहू सुरेख बाई, रवा त्याचा काढावा
    असा रवा सुरेख बाई, करंज्या त्याच्या कराव्या

    असा करंज्या सुरेख बाई, तबकात ठेवाव्या
    असा तबक सुरेख बाई, शेल्याने झाकावे

    असा शेला सुरेख बाई, पालखीत ठेवावा
    अशी पालखी सुरेख बाई, माहेरी पाठवावी

    असा महेर सुरेख बाई, खेळायला सापडते
    असा संसार द्वाड बाई, कोंडूकोंडू मारते



    ३. अडकित जाऊ का खिडकीत जाऊ


    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता
    भुलाबाईच्या लेक झाला नाव ठेवा दत्ता

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होती मूर्ती
    भुलाबाईच्या लेक झाली नाव ठेवा कीर्ती

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होती चाबी
    भुलाबाईच्या लेक झाली नाव ठेवा बॉबी

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होती आरती
    भुलाबाईच्या लेक झाला नाव ठेवा भारती

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होता साबू
    भुलाबाईच्या लेक झाला नाव ठेवा बाबू

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होत्या पिना
    भुलाबाईच्या लेक झाली नाव ठेवा मीना

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होते कॅलेंडर
    भुलाबाईच्या लेक झाला नाव ठेवा अलेकझांडर

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होती बशी
    भुलाबाईच्या लेक झाली नाव ठेवा काशी

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होत्या कपबश्या
    भुलाबाईच्या लेक झाली नाव ठेवा आश्लेषा

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होत पाऊल
    भुलाबाईच्या लेक झाला नाव ठेवा राहुल

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ, खिडकीत होता हिरा
    भुलाबाईच्या लेक झाला नाव ठेवा मीरा

    अडकित जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत पाय घसरला
    भुलाबाईच्या लेक झाला, साखर पेढा विसरला



    ४. आला माझ्या सासरचा वैद्य


    आला माझ्या सासरचा वैद्य
    डोक्यात टोपी फाटकी तुटकी
    अंगात सदरा फाटका तुटका
    पायात बूट फाटके तुटके
    हातात काठी जळके लाकूड
    तोंडात विडा शेणाचा
    कसा ग दिसतो बाई भिकाऱ्यावानी
    बाई भिकाऱ्यावानी


    आला ग माझ्या माहेरचा वैद्य
    डोक्यात टोपी जरीकाठी
    अंगात सदरा मखमली
    नेसायला धोतर भरजरी
    पायात बूट पंचरंगी
    तोंडात विडा केशराचा
    कसा ग दिसतो बाई राजावणी
    बाई राजावणी


    ५. नदीच्या काठी राळा पेरला


    नदीच्या काठी राळा पेरला बाई राळ पेरला
    एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला

    एकच कणीस तोडून नेलं बाई तोडून नेलं
    सईच्या अंगणात टाकून दिल बाई टाकून दिल

    सईन उचलून घरात नेलं बाई घरात नेलं
    कांडून कांडून राळा केला बाई राळा केला

    राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली
    दोन पैशांच्या बांगड्या भरल्या बाई बांगड्या भरल्या

    पाच पैशाची घागर आणली बाई घागर आणली
    घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
    मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला



    ६. आज कोण वार बाई


    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज सोमवार , महादेवाला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज मंगळवार , मंगळागौरीला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज बुधवार , बृहस्पतीला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज गुरुवार, दत्तात्रयाला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज शुक्रवार , अंबाबाईला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज शनिवार , मारुतीला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आज रविवार , सूर्यदेवाला नमस्कार

    आज कोण वार बाई, आज कोण वार ??
    आठवड्याचे सात वार, आम्हाला आठवते देवाचे नाव
    देवाचे नाव आठवत जावे, कामात मन रमवून घ्यावे
    कामात मन रमून जाते, भाग्याचे फळ नशिबा येते



    ७. एक लिंबू झेलू बाई


    एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
    दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
    तीन लिंबू झेलू बाई चार लिंबू झेलू
    चार लिंबू झेलू बाई पाच लिंबू झेलू
    पाचा लिंबाचा पानोठा

    माळ घातली हनुमंताला
    हनुमंताची निळी घोडी
    येता जाता कमळ तोडी

    कमळाच्या पाठीमागे लपली राणी
    अगं अगं राणी इथे कुठे पाणी
    पाणी नव्हे यमुना जमुना

    यमुना जमुनेची बारीक वाळू
    तेथे खेळे चिल्लारी बाळू
    चिल्लारी बाळूला भूक लागली
    सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
    पाटावरवच्या गादीवर निजवले
    निज रे निज रे चिल्लारी बाळा

    मी तर जाते सोनार वाडा
    सोनार दादा, सोनार दादा
    गौरीचे मोती झाले की नाही
    गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
    उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
    पण सुपारी उद्या दुपारी


    ८. अडकावरच्या खडकावर



    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला लाल रंग देतो

    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला निळा रंग देतो

    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला पिवळा रंग देतो

    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला जांभळा रंग देतो

    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला मोरपिशी रंग देतो

    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला केशरी रंग देतो

    अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो
    भुलाबाईच्या साडीला हिरवा रंग देतो

    (असे वेगवेगळ्या रंग टाकून गाणे वाढवले जाते )



    ९. चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई


    चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या, जागवल्या
    सासू पुसते सुनेला सुनेला
    पाटल्यांचा जोड काय केला, काय केला ??
    काय तुझ्या बापाने घडवला घडवला

    चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या, जागवल्या
    सासू पुसते सुनेला सुनेला
    तोरडयांचा जोड काय केला, काय केला ??
    काय तुझ्या बापाने घडवला घडवला

    चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या, जागवल्या
    सासू पुसते सुनेला सुनेला
    अंगठ्यांचा जोड काय केला, काय केला ??
    काय तुझ्या बापाने घडवला घडवला

    चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या, जागवल्या
    सासू पुसते सुनेला सुनेला
    जोडव्यांचा जोड काय केला, काय केला ??
    काय तुझ्या बापाने घडवला घडवला

    (इथे वेगवेगळी दागिन्यांची नावे टाकून गाणं मोठे करतात )



    १०. पोर्णिमेचं पडलं चांदणं



    पोर्णिमेचं पडलं चांदणं, भुलाबाईला आलं मागणं

    आईच एक सांगणं, सासूशी नीट वागणं
    भावाचं एक सांगणं, दिराशी नीट वागणं
    बहिणीचं एक सांगणं, नणंदेशी नीट वागणं
    आजीचं एक सांगणं, नवऱ्याशी नीट वागणं
    आजोबांचं एक सांगणं, साऱ्यांशी नीट वागणं

    सर्वांचं एक सांगणं ,माहेरचं नाव काढणं





    तर मित्रानो, आज आपण Bhulabai Che Gane बघितली. तुम्हाला हि काशी वाटली आणि तुम्ही हा सण साजरा करता का ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य मराठी लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    धन्यवाद !!!!!!!!!!

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.